वॉशिंग्टन डी. सी. - परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या एच-1 बी व्हिसा 2020 च्या उर्वरीत काळासाठी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर ट्रम्प प्रशासनाने व्हिसामधील काही नियम शिथिल केले आहेत. जे व्हिसाधारक व्हिसा बंदीच्या घोषणेपूर्वी जी नोकरी करत होते. त्याच नोकरीत परत येत असतील, तर त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
तज्ज्ञ, ज्येष्ठ-स्तरीय व्यवस्थापक आणि इतर कामगार ज्यांच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, अशा व्यक्तींनाच प्रवास करण्यात परवानगी मिळेल. प्राथमिक व्हिसाधारकांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांनाही प्रवेश दिला जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या सल्लागारांनी सांगतिले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एच-१बी व्हिसा वर्षभरासाठी रद्द करण्याची घोषणा केली होती. अमेरिकेतील लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. यापुढे एच-१बी व्हिसा हवा असणाऱ्या लोकांना 2020 संपेपर्यंत वाट पाहावी लागणार होती. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने शिथिलता दिल्याने जे अमेरिकेत पूर्वीपासून नोकरी करत आहेत, त्यांना दिलासा मिळाला आहे.