तेगुचिगाल्पा - मध्य अमेरिकेतील देश होंडुरासमधील उष्णकटिबंधीय वादळ एटामुळे झालेल्या मृत्युंची संख्या वाढून 57 झाली आहे. तर आणखी आठ जण या भीषण पुरात बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे कहर कोसळल्यानंतर वादळ आता क्युबाकडे वळले आहे.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य नियोजित स्थायी आकस्मिकता आयोगाने (सीओपीईसीओ - COPECO) सोमवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात वादळामुळे देशभरात 18 लाख 71 हजार 709 लोक प्रभावित झाले आहेत.
होंडुरासमध्ये उष्णकटिबंधीय वादळ एटाचे थैमान त्यातून 68 समुदायांतील 1 लाख 1 हजार 722 लोकांना घरे सोडण्यास भाग पडले आणि 73 हजार 647 लोकांना उंच ठिकाणांवरील भूभागाकडे विस्थापित व्हावे लागले.
या संकटाने 14 हजार 242 घरे, 113 रस्ते, तीन शाळा आणि 29 पुलांचे नुकसान केले. तर, 41 हजार 945 लोकांना वाचविण्यात यश आले आणि 39 हजार 399 लोकांना देशभरात उभारण्यात आलेल्या निवारागृहांमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा -मेक्सिकोमध्ये कोसळधार! भूस्खलन आणि पूरात 27 लोकांचा मृत्यू
उत्तरी सुला व्हॅली हा सर्वांत जास्त नुकसान झालेला प्रदेश आहे. येथे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे पिमिनेटा, बराकोआ, पोटेरिलोस, ला लिमा आणि चोलोमा यासारख्या संपूर्ण शहरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
निकाराग्वा, ग्वाटेमाला, अल साल्वाडोर, मेक्सिको, कोलंबिया यांना देशांकडून मिळालेल्या मदत आणि पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जुआन ऑरलँडो हर्नांडेझ यांनी ट्विट केले आहे.
'होंडुरान जनतेच्या वतीने, या कठीण परिस्थितीत एकता दाखवणाऱ्या आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या मित्रदेशांचे आभार,' असे राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. 'लवकरच, आम्ही बचावकार्य पूर्ण करून देशाच्या पुनर्बांधणीकडे लक्ष देऊ' असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा -तुर्की : भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 114 वर, बचावकार्य पूर्ण