वॉशिग्टंन डी. सी - डेमॉक्रॉटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर बायडेन यांना अमेरिकी नागरिकांनी कौल दिला. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. ट्रम्प समर्थकांनीही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाला विरोध दर्शवला आहे. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकत्र येत, ट्रम्प समर्थकांनी फलक आणि बॅनर झळकावत घोषणाबाजी केली.
राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकत्र येत ट्रम्प समर्थकांनी निवडणूक निकालाला विरोध दर्शवला व्हाईट हाऊसजवळील फ्रीडम प्लाझा ट्रम्प समर्थक एकत्र आले. 'फोर मोअर इअर्स’, ‘स्टॉप दी स्टील’, ‘वुई वॉन्ट ट्रम्प’ अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. यावेळी डोनाल्ड ट्रम्प ही आंदोलनस्थळी दाखल झाले. मात्र, ते आंदोलनात सामिल झाले नाहीत. कारच्या खिडकीतूनच हात उंचावत त्यांनी समर्थकांचे आभार मानले. माजी टी पार्टी कार्यकर्ते अॅमी क्रिमर यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.
अद्यापही सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू नाही -
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव अद्यापही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला नाही. निवडणुकीत गैरप्रकार झाला असून अवैध मार्गाने बायडेन निवडून आले आहेत, असा आरोप ट्रम्प यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अद्यापही सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली नाही. बायडेन हे 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत अमेरिकेचे सर्व विभाग बायडेन प्रशासनाच्या हाती येणे आवश्यक आहे. ट्रम्प यांच्याकडून सरकार स्थापन करण्याबाबत अडथळे निर्माण केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रध्यपदाचा निकाल -
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. निवडणुकीत 290 इलेक्ट्रोल व्होट्स त्यांना मिळाली असून अमेरिकेत आता नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रध्यक्षपदाचा उमेदवार तब्बल 74 दशलक्ष मतांनी विजयी झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते.
हेही वाचा -'भारत-पाकिस्तानने चर्चा करून सीमेवरील रक्तपात थांबवावा'