युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर शांतता चर्चा उधळल्याचा आरोप केला आहे. तसेच कोणत्याही प्रादेशिक सवलती देण्यास नकार दिला. मंगळवारी पहाटे त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. रशियाने सोमवारी संध्याकाळी दोन रशियन-समर्थित फुटीरतावादी प्रदेशांना औपचारिकपणे स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर युक्रेन शांतता आणि मुत्सद्देगिरीसाठी वचनबद्ध असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युक्रेनेने रशियाच्या निर्णयावर जोरदार हरकत घेत त्यांनी केलेल्या तसेच करत असलेल्या कारवाईला आपला विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रपती म्हणाले की युक्रेनला रशियाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांकडून स्पष्ट आणि प्रभावी पावले उचलण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी युक्रेन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या नेत्यांची आपत्कालीन शिखर परिषद बोलावण्यात आली आहे.
सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक -
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केल्यानंतर आणि तेथे शांतता राखण्याचे आदेश रशियन सैन्याला दिल्यानंतर सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद तातडीची बैठक घेणार आहे. युक्रेन, अमेरिका आणि इतर सहा देशांच्या विनंतीवरून ही बैठक होत आहे. युक्रेनवर होणारी ही बैठक सर्वांसाठी खुली असणार आहे.