जिनिव्हा - संपूर्ण जगाला कोरोनावरील लसीचा पुरवठा होईपर्यंत शांत बसणार नाही, असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रायसस यांनी केले आहे. जगातील सर्व देशांना लस मिळेपर्यंत जागतिक आरोग्य संघटना अविरत कार्यरत राहील, असेही त्यांनी म्हटले. चीनमध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याचे वैज्ञानिकांनी सर्वात प्रथम जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले होते. या घटनेची वर्षपूर्ती झाली. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिषदेत डब्ल्यूएचओचे महासंचालक बोलत होते.
वैज्ञानिकांची एक वर्षाच्या आत मोठी कामगिरी -
एक वर्षाच्या आत कोरोनावरील लस तयार होऊन जगभरात पुरवठाही सुरू झाला आहे. ही खुप मोठी वैज्ञानिक कामगिरी असल्याचे टेड्रोस घेब्रायसस म्हणाले. कोरोना संपवण्यासाठीचे प्रयत्न सर्वोत्तम आहेत. मात्र, जोपर्यंत सर्व देशांना लस मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले.
युरोप, अमेरिका इंग्लडसह अनेक देशांनी आणीबाणीच्या काळातील वापरासाठी कोरोनाच्या लसीला परवानगी दिली आहे. यामध्ये फायजर आणि बायोएनटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचा समावेश आहे. आरोग्य कर्मचारी आणि संवेदनशील लोकसंख्येच लसीकरण या देशांत आता सुरू झाले आहे. २०२१ साली कोरोनाविरोधात लढताना नवी आव्हानं उभी राहू शकतात, असा इशारा आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिला आहे.