महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आगडोंब, वाचा संपूर्ण प्रकरण... - जॉर्ज फ्लॉईड प्रकरण

जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये आगडोंब उसळला आहे. आंदोलकांनी दुकानांना आग लावल्याचे निर्दशनास येत असून दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.

जॉर्ज फ्लॉईड
जॉर्ज फ्लॉईड

By

Published : May 31, 2020, 12:06 PM IST

Updated : May 31, 2020, 12:18 PM IST

मिनिआपोलिस - जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून बळी गेल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये आगडोंब उसळला आहे. आंदोलकांनी दुकानांना आग लावल्याचे निर्दशनास येत असून दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. मिनिसोटा राज्यातील मिनियापोलिस शहरात सुरू झालेला हिंसाचार आता लॉस एंजेलिस शहरापर्यंत पोहोचला आहे.

जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरूच

पोलीस परिस्थिती नियंत्रणात आण्याच्या प्रयत्नात आहेत. काही भागात आंदोलकांना पागवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत पोलीस लाठीमारही करत आहेत. शहरातील रेल्वे आणि बससेवा बंद आहेत. पोलिसांनी आंदोलनकांना घरी जाण्याचे आवाहन केले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. #BlackLivesMatter आणि #JusticeforGeorgeFloyd हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

तर, डेट्रॉयट येथे निदर्शने करणाऱ्यावर एका व्यक्तीने गोळी चालवली. यामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता डेट्रॉयटजवळ ग्रीक टाऊनमध्ये ही घटना घडली. या गोळीबारामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग नव्हता. ज्या व्यक्तीने गोळी चालवली त्यांचा शोध पोलीस घेत असल्याचे डेट्रॉयट पोलीस प्रवक्ते सार्जेंट निकोल किर्कवुड यांनी सांगितले.

काय प्रकरण ?

मिनिआपोलिस शहरात 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचे या पोलिसाला सांगतानाही दिसत आहेत. 'मला श्वास घेता येत नाही. कृपया माझा जीव घेऊ नका', अशी विनवणी जॉर्ज फ्लॉइड पोलिसांना करीत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

पोलीस अधिकारी बडतर्फ

जॉर्ज फ्लॉइड यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनेशी संबधित तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये डेरेक शॉविन या 44 वर्षीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात सहभागी असलेल्या अन्य तीन अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी आंदोलकांनी केली आहे.

जॉर्ज फ्लॉइड यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण भागामध्ये हिंसाचार सुरू झाला. फ्लॉइड यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ संचारबंदी धुडकावून नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात निर्दशने करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाचे लोण आता अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये पसरले आहे. तसेच मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वाल्झ यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे सैनिक नसल्याचे म्हटले आहे.

यांनी नोंदवला निषेध -

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मी जॉर्ज फ्लॉइड यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर रडलो. या व्हिडिओने मला एक प्रकारे तोडले. ही घटना फारच दुःखद आहे, असे ओबामा म्हणाले. तसेच युनाटेड नेशन्सच्या मानवी हक्क प्रमुख मिशेल बॅशलेट यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूबाबत दु;ख व्यक्त केले असून ही घटना खूप भयंकर असल्याचे म्हटले आहे. मात्र, यातच ट्रम्प याचे 'When the looting starts, the shooting starts' हे टि्वट वादात सापडले आहे.

अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिकांवर होणार्‍या हल्ल्यांच्याविरोधात ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ हे स्वतंत्र आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनाने अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात यश मिळवले आहे. 2014ला न्यूयार्कमध्ये एरिक गार्नर या २७ वर्षांचा तरुणही पोलिसांच्या दडपशाहीमध्येच मृत्यूमुखी पडला होता. गार्नरच्या मृत्यूनंतर 'ब्लॅक लाइव्ह मॅटर' या चळवळीने जोर धरला होता आणि 'आय कान्ट ब्रीद' हे या चळवळीचे ब्रीदवाक्य झाले.

Last Updated : May 31, 2020, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details