वॉशिंग्टन डी. सी- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २० जानेवारीला पदाची शपथ घेणार आहे. या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, तसेच संसदेवरील हिंसाचारासारखी घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अमेरिकेतील ५० राज्यातील सरकारी कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
संसदेला तारेचे दुहेरी कुंपण -
अॅरिझोना राज्यात पुन्हा आंदोलन होण्याची चिन्हे दिसत असल्याने पोलिसांनी स्टेट कॅपिटोल इमारतीला काटेरी कुंपण लावून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राजधानी वॉशिंग्टन डी. सी मध्ये शस्त्रसज्ज २० हजार जवान तैनात करण्यात येत आहेत. मागील आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी संसेदत धुडगूस घातला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यावेळीही आंदोलन होणार असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्या पाश्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
गुप्तचर यंत्रणांचा इशारा -
अमेरिकेतील सर्व राज्यात हिंसक आंदोलन होण्याची शक्यता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वच राज्यांच्या विधिमंडळ म्हणजेच कॅपिटोल इमारींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोबतच सर्व सरकारी इमारतींबाहेर पोलीस आणि लष्कराचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शस्त्रसज्ज बंदोबस्तामुळे लोकशाहीची मंदिरे युद्ध सुरू असलेल्या देशांतील इमारतींसारखी दिसत आहेत. शपथविधी कार्यक्रमावेळी कोणताही हिंसाचार घडू नये म्हणून गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.