वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने 'ऑपरेशन मेगा' सुरू केले आहे. कोरोनाची लागण झाल्याने ट्रम्प सध्या उपचार घेत असून प्रत्यक्ष प्रचारापासून ते दूर आहेत. ते बरे होऊन येईपर्यंत पक्षातील इतर नेते प्रचाराचा धुरा सांभाळणार आहेत. ट्रम्प यांनी या निवडणुकीतही 'ऑपरेशन मेगा' म्हणजे 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'चा नारा दिला आहे.
'ऑपरेशन मेगा'मध्ये उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यासह ट्रम्प यांच्या कुटुंबातील काही सदस्य महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्र्म्प यांनी ट्विट करून सांगितले होते. सध्या त्यांच्यावर अमेरिकेच्या मुख्य सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ३ नोव्हेंबरला होत आहे. त्याअगोदरच ट्रम्प यांना कोरोना झाल्याने त्यांच्या प्रचारावर याचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन 'ऑपरेशन मेगा' सुरू करण्यात आले आहे.