वाशिंटन :जगभरातीलमहत्त्वाचे नेते, प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतील नामवंतांचा ‘पेंडोरा पेपर्स’मध्ये समावेश असल्याचा खुलासा इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) यांनी केला आहे. या रिपोर्टनुसार या प्रकरणात अनेक भारतीयांसह 35 वर्तमान आणि माजी जागतिक नेते, 330 हून अधिक राजकारणी आणि 91 देश आणि प्रदेशातील सार्वजनिक अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, पॉप सिंगर दिवा शकीरा, सुपरमॉडेल क्लाउडिया शिफर आणि लेल द फॅट वन म्हणून ओळखला जाणारा इटालियन मोबस्टर यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
या तपासात, कर चुकवण्यासाठी वापल्या जाणाऱ्या पद्धतींचादेखील खुलासा झाला आहे. तसेच यात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे मंत्री आणि भारत, रशिया, अमेरिका, मेक्सिको आणि इतर राष्ट्रांतील 130 पेक्षा जास्त अब्जाधीशांच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील या फायलींमध्ये आहेत. या अहवालानुसार, पेंडोरा पेपर्समध्ये युक्रेन, केनिया आणि इक्वेडोरचे अध्यक्ष, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे व्यवहार उघडकीस आले.