द्विपक्षीय चर्चेने भारत-पाकिस्तान काश्मीर मुद्दा सोडवू शकणार नाहीत - इम्रान खान
'गेल्या फेब्रुवारीत काही घटना (पुलवामा) घडून गेली. यामुळे या उपखंडात काही समज तयार झाला. त्यानंतर आमच्या सीमेवर पुन्हा तणावाला सुरुवात झाली. याविषयी ट्रम्प यांच्याशी बोलून ते यामध्ये काही भूमिका निभावू शकतील, अशी विनंती केली आहे. अमेरिका जगातील सर्वात बलवान देश आहे. केवळ हाच देश भारत-पाक दरम्यानचा काश्मीर प्रश्न सोडवण्यात मध्यस्थी करू शकतो,' असे इम्रान खान म्हणाले.
वॉशिंग्टन - पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकन माध्यमांशी बोलताना 'द्विपक्षीय चर्चेने भारत-पाकिस्तान काश्मीर मुद्दा सोडवू शकणार नाहीत,' असे म्हटले आहे. तसेच, 'अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनेच या प्रश्नावर तोडगा निघणे शक्य आहे. भारत-पाक संबंध सुधारण्यात अमेरिका यात मोठा वाटा उचलू शकेल,' असे ते म्हणाले.
'द्विपक्षीय चर्चेने काश्मीर प्रश्नावर तोडगा निघणार नाही,' असे म्हणत इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताशी चर्चा करण्यात मध्यस्थी करण्याची गळ घातली. यादरम्यान, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्याला या चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर भारताकडून जोरदार टीका करण्यात आली.
'जेव्हा जनरल परवेझ मुशर्रफ पाकचे पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी चांगल्या रीतीने द्विपक्षीय संवाद साधला होता. त्या सुमारास काश्मीर मुद्दा सुटण्याच्या अगदी जवळचा टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतरपासून आम्ही दोन्ही देश दोन ध्रुवांवर फेकले गेलो. मला भारताने चर्चेसाठी पुढे यावे असे वाटते. यामध्ये अमेरिका मोठी भूमिका निभावू शकेल. अध्यक्ष ट्रम्प नक्कीच काहीतरी करू शकतील,' असे खान यांनी अमेरिकन माध्यमांना सांगितले.
'आम्ही पृथ्वीवरील १.३ दशलक्ष लोकांविषयी बोलत आहोत. शांततेचा भंग करणाऱ्यांनो, कोणत्या तरी प्रकारे हा मुद्दा सोडवण्याचा विचार करा,' असेही खान यांनी भारताचे नाव न घेता म्हटले आहे.
पाक पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. 'गेल्या फेब्रुवारीत काही घटना घडून गेली. यामुळे या उपखंडात काही समज तयार झाला. त्यानंतर आमच्या सीमेवर पुन्हा तणावाला सुरुवात झाली. याविषयी ट्रम्प यांच्याशी बोलून ते यामध्ये काही भूमिका निभावू शकतील, अशी विनंती केली आहे. अमेरिका जगातील सर्वात बलवान देश आहे. केवळ हाच देश भारत-पाक दरम्यानचा काश्मीर प्रश्न सोडवण्यात मध्यस्थी करू शकतो,' असे इम्रान खान म्हणाले.
सध्या इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते पाकिस्तानला शांतिदूत आणि भारत शांतीचा भंग करत असल्याचे म्हणत आहेत. खान यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ नरेंद्र मोदी निवडून आले तरच भारत-पाक सुसंवाद सुरू होईल, असे म्हटले होते. मोदी सरकारने पुलवामा हल्ल्यानंतरच पाकविरोधात कडक भूमिका घेतली होती. पाकच्या भूमीवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याठी बालाकोट एअर स्ट्राईक घडवून आणला. आता दुसऱ्या कार्यकाळातही मोदी सरकारने ही भूमिका कायम ठेवत पाककडून भारतात निर्यात होणारा दहशतवाद संपल्याशिवाय चर्चा शक्य नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पाकची पुरती भंबेरी उडाली असून आता त्यांनी अमेरिकेकडे मध्यस्थीची गळ घातल्याचे दिसत आहे. तसेच, अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला जावा असे प्रयत्न करत आहेत.