न्यूयॉर्क -भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेतील अनिवासी भारतीय संघटना 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर सर्वात मोठा तिरंगा फडकवणार आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (FIA) ने गेल्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनी टाइम्स स्क्वेअर येथे भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता. न्यूयॉर्क शहरातील आयकॉनिक डेस्टिनेशनवर भारतीय तिरंगा फडकवण्याची ही पहिलीच वेळ होती. या कार्यक्रमाचे स्वतःचे महत्त्व असल्याने प्रत्येक वर्षी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवण्याचा संघटनेचा मानस असल्याचे एफआयएचे अध्यक्ष अंकुर वैद्य म्हणाले. आम्हाला ही परंपरा चालू ठेवायची आहे. या वर्षी, टाइम्स स्क्वेअरवर आम्ही जो तिरंगा फडकवणार आहोत. तो आतापर्यंत अमेरिकेत फडकवलेल्या तिरंग्यांपेक्षा सर्वात मोठा असेल, असेही त्यांनी सांगितले.
न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्यदूत रणधीर जैस्वाल तिरंगा फडकवतील. या कार्यक्रमात भारतीय-अमेरिकन खेळाडू आणि बुद्धिबळ इतिहासातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर 12 वर्षीय अभिमन्यू मिश्रा आणि गेल्या महिन्यात विम्बल्डन बॉईज एकेरीचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचणारा 17 वर्षीय समीर बॅनर्जीला सम्मानित केले जाईल.