न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अमेरिकेतील ह्युस्टन येथे पोहचले. आज होणाऱ्या कार्यक्रमात ते अमेरिकेतील भारतीयांना संबोधतील. ह्युस्टनमधील 'एनजीआर' फुटबॉल स्टेडिअमवर हा कार्यक्रम होणार आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, ५० हजारांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
'टेक्सास इंडिया फोरम'ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीड हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत. ३ आठवड्यांच्या आत या कार्यक्रमाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.