महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चिक्की नव्हे तर... चक्क सूर्य! सौरपृष्ठभागाचे सर्वात सुस्पष्ट छायाचित्र प्रसिद्ध

हवाईमध्ये असणाऱ्या डॅनियल के. इनुये या नव्या दुर्बीणीतून हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. यामध्ये सूर्य हा शेंगदाण्याच्या चिक्कीप्रमाणे दिसून येत आहे. सूर्याच्या अशांत अशा पृष्ठभागावर असणारा प्लाझ्माही या छायाचित्रामध्ये दिसून येत आहे. या दुर्बीणीला 'अत्याधुनिक सौर दुर्बीण' असे नाव देण्यात आल होते. मात्र, २०१३ मध्ये सिनेटचे दिवंगत सदस्य डॅनियल इनुये यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या दुर्बीणीला देण्यात आले.

Never-seen images of Sun's turbulent surface released
सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वात सुस्पष्ट छायाचित्र प्रसिद्ध..!

By

Published : Jan 30, 2020, 10:45 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील हवाई बेटांवरील खगोलशास्त्रज्ञांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) सूर्याच्या पृष्ठभागाचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. आजपर्यंत घेतलेल्या छायाचित्रांपैकी हे सर्वात जवळून घेतलेले, आणि सर्वात सुस्पष्ट छायाचित्र असल्याचा दावा या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.

हवाईमध्ये असणाऱ्या डॅनियल के. इनुये या नव्या दुर्बीणीतून हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. यामध्ये सूर्य हा शेंगदाण्याच्या चिक्कीप्रमाणे दिसून येत आहे. सूर्याच्या अशांत अशा पृष्ठभागावर असणारा प्लाझ्माही या छायाचित्रामध्ये दिसून येत आहे. या नव्या दुर्बीणीमध्ये १३ फुटांचा आरसा लावण्यात आला आहे. आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही सौर-दुर्बीणीमध्ये एवढा मोठा आरसा बसवण्यात आला नाहीये. या दुर्बीणीला 'अत्याधुनिक सौर दुर्बीण' असे नाव देण्यात आले होते. मात्र, २०१३ मध्ये सिनेटचे दिवंगत सदस्य डॅनियल इनुये यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या दुर्बीणीला देण्यात आले.

राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे संचालक फ्रान्स कोर्डोवा म्हणाले, की जेव्हापासून या नव्या दुर्बीणीचे काम आम्ही सुरू केले होते, तेव्हापासून यातून टिपल्या जाणाऱ्या पहिल्या छायाचित्रांची आम्ही वाट पाहत होतो. सूर्याची जेवढी छायाचत्रे आतापर्यंत काढण्यात आली होती, त्यांपैकी हे सर्वात जवळचे आणि सुस्पष्ट छायाचित्र आहे. सूर्याच्या कोरोनामधील चुंबकीय क्षेत्राचा अंदाज या दुर्बीणीच्या मदतीने लावता येणार आहे. या क्षेत्रामध्ये होणाऱ्या विस्फोटांचा पृथ्वीवरही परिणाम होतो. त्यामुळे ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. या दुर्बीणीमुळे सूर्याचा अधिक जवळून अभ्यास करता येणार आहे, तसेच सौरवादळांबाबतही आगाऊ अंदाज लावता येणे शक्य होणार असल्याचे कोर्डोवा यांनी सांगितले.

पुढील सहा महिने खगोलशास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांचे एक पथक या दुर्बीणीची चाचणी घेणे सुरू ठेवतील, जेणेकरून आंतरराष्ट्रीय सौर संशोधकांना त्याचा वापर करता येईल. "इसवी सन १६१२ मध्ये गॅलिलीओ या खगोलशास्त्रज्ञाने पहिल्यांदा दुर्बीणीतून सूर्याचे निरीक्षण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत आपण सूर्याची जेवढी माहिती गोळा केली आहे, त्याहून अधिक माहिती ही दुर्बीण केवळ पुढील पाच वर्षात गोळा करेल", असे मत डेव्हिड बोबोल्ट्झ यांनी व्यक्त केले. डेव्हिड हे राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या खगोलशास्त्र विभागातील प्रोग्राम संचालक आहेत.

हेही वाचा : लगीन घाई! बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद असल्याने नवरदेव पायी आले मंडपात

ABOUT THE AUTHOR

...view details