वॉशिंग्टन :चंद्राच्या प्रकाशित पृष्ठभागावरही आता पाण्याचे अवशेष आढळून आले आहेत. नासाच्या सोफिया (स्ट्रॅटोस्फेरिक ऑबजर्वेटरी फॉर इन्फ्रारेड अॅस्ट्रोनॉमी)ने याबाबत संशोधन केले आहे. यापूर्वी चंद्रावर जेवढे म्हणून पाण्याचे अवशेष मिळाले होते, ते सर्व चंद्राच्या अप्रकाशित भागात आढळून आले होते. चंद्राच्या प्रकाशित भागात पाणी सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे.
चंद्रावर सगळीकडे पसरले आहे पाणी..
सोमवारी नासाच्या वैज्ञानिकांनी या शोधाबाबत माहिती दिली. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे पाण्याचे मोठे साठे नसले, तरी तेथील पाण्याचे अस्तित्व हे पूर्वीच्या समजाप्रमाणे केवळ अप्रकाशित भागात नाही. तर, चंद्रावर सगळीकडेच असलेल्या मातीमध्ये पाण्याचे अवशेष आढळून आले आहेत. तसेच, कायम अप्रकाशित असणाऱ्या भागामध्ये बर्फाच्या रुपात पाणी लपलेले असू शकते, असा दावाही नासाने केला आहे.
क्लेव्हिस क्रेटरमध्ये आढळले पाणी..
केसी हॉन्निबॉल यांच्या एका पथकाने याबाबतचे संशोधन केले. चंद्रावरील मोठ्या क्रेटर्सपैकी एक असलेल्या क्लेव्हिस क्रेटरमधील डेब्रिस ग्रेन्समध्ये त्यांना पाण्याचे अवशेष दिसून आले. चंद्राच्या दक्षिण भागात हे क्रेटर आहे. यापूर्वी केलेल्या संशोधनामध्ये याठिकाणी हायड्रोजनचे अस्तित्व असल्याचा पुरावा मिळाला होता. मात्र हा हायड्रोजन पाण्याच्या स्वरुपात होता, (एच२ओ) कि हायड्रोक्सिल (ओएच)च्या स्वरुपात होता याबाबत स्पष्टता झाली नव्हती.