वॉशिंग्टन :'इनजेन्युईटी' हे हेलिकॉप्टर मंगळावर उतरले असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सांगितले आहे. ११ एप्रिलला या हेलिकॉप्टरचे उड्डाण पार पडणार आहे. नासाच्याच पर्सेवरेन्स रोव्हरला जोडून हे हेलिकॉप्टर मंगळावर पाठवण्यात आले होते. १८ फेब्रुवारीला पर्सेवरेन्स मंगळावर लँड झाले होते.
"मार्स हेलिकॉप्टर हे मंगळावरील जमिनीवर उतरले आहे. हे हेलिकॉप्टर रोव्हरवरुन जमिनीवर सुरक्षितपणे उतरवण्यात नासाच्या वैज्ञानिकांना यश आले आहे." अशा आशयाचे ट्विट करत नासाच्या कॅलिफोर्नियामधील जेट प्रोपल्शन लॅबने याबाबत माहिती दिली.
या हेलिकॉप्टरचे मंगळावरील उड्डाण ८ एप्रिलला होणार होते. मात्र, नासाने हे उड्डाण ११ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले. गेल्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात आला.