न्यूयॉर्क - अमेरिकेच्या ईशान्य भागात रात्रभर झालेल्या जोरदार वादळानंतर न्यूयॉर्कमधील एक लाखाहून अधिक लोकांच्या धरात ख्रिसमसच्या सकाळी वीज गायब झाली होती.
वेस्टचेस्टर, रॉकलँड, अलस्टर, ऑरेंज आणि डचेस काऊन्टी विशेषत: प्रभावित झाले आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने पॉवरआउटेज डॉट यूएस या संस्थेच्या हवाल्याने दिली आहे. शुक्रवारी सकाळी या पाच ठिकाणांवरील सुमारे 73 हजार 926 लोक प्रभावित झाले.
न्यूयॉर्क सिटीमध्ये 17 हजार पेक्षा कमी लोक प्रभावित झाले. स्टॅटन आयलँडमध्ये सुमारे 3 हजार 500 लोक प्रभावित झाले.
हेही वाचा -अमेरिकेत एका दिवसातील सर्वाधिक ४ लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
ताशी 65 मैल (105 किलोमीटर) पर्यंत वेगाने वाहात असलेल्या वाऱ्यांचा आणि पावसाचा परिणाम न्यू जर्सीवरही झाला. वीज नसल्यामुळे येथील 49 हजाराहून अधिक रहिवासी बाधित झाले. पॉवरआउटेज डॉट यूएसच्या म्हणण्यानुसार ईशान्य भागातील 2 लाख 75 हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
न्यूयॉर्कच्या राज्यपाल कार्यालयाने सांगितले की, राज्याने बचाव पथकांना राज्यभरातील मोक्याच्या ठिकाणी आधीच तैनात केले आहे. आपात्कालीन परिस्थितीत पथकांनी वॉटर पंप, वीज जनरेटर आणि अगदी ब्लँकेट्स-उशांचाही साठा केला आहे.
'कोणत्याही संभाव्य परिणामाची तयारी करण्यासाठी सर्व काही केले जात आहे आणि मदतीची आवश्यकता असलेल्या आमच्या स्थानिक भागीदारांना मदत करण्यास राज्य तयार आहे,' असे राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
ते म्हणाले की, यादरम्यान मी प्रत्येकाला विचारपूर्वक उत्सव साजरा करावा आणि पुढच्या 48 तासांत प्रवासामध्ये काळजी घ्यावी, असे आवाहन करतो.
हेही वाचा -होंडुरासमध्ये उष्णकटिबंधीय वादळ अयोटाचा कहर, 14 जणांचा मृत्यू