न्यूयॉर्क- एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे चक्रीवादळ अशा स्थितीला अमेरिकेतील काही राज्ये सामोरे जात आहेत. इडा चक्रीवादळाचा अमेरिकेच्या पूर्व सागरी किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. वादळाने मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. गुरुवारी झालेल्या विक्रमी पाऊसामुळे 40 हून अधिक नागरिकांचा घरात आणि कारमध्ये जमा झालेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अमेरिकेच्या ईशान्य भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मुसळधार झालेल्या पावसामुळे मेरीलँडमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी सुमारे 46 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? शोटुल जिल्हा ताब्यात घेतल्याचा दावा
न्यू जर्सीमध्ये किमान 23 जणांचा मृत्यू झाल्याचे न्यू जर्सीचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर फिल मर्फी यांनी सांगितले. न्यूयॉर्क शहरात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामध्ये 11 जणांचा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये मृत्यू झाला आहे. हे नागरिक परवडणाऱ्या घरांमध्ये राहत होते.
पेन्नीसिलिव्हिनियामध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाचा झाड कोसळून मृत्यू झाला. तर कारमध्ये अडकलेल्या पत्नीला मदत केल्यानंतर पतीचा पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मेरीलँडमध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.