वॉशिंग्टन : या वर्षीच्या सुरूवातीला जगभरातील हजारो संगणकांना फटका बसलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज ईमेल सर्व्हर हॅकिंगमागे चीनचाच हात असल्याचा थेट आरोप राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने सोमवारी केला.
चीनकडून असणाऱ्या इतरही अनेक सायबर धोक्यांचा खुलासाही बायडेन प्रशासन आणि सहकारी राष्ट्रांकडून करण्यात आला आहे. यात सरकारशी संलग्नित हॅकर्सकडून केल्या जाणाऱ्या रॅन्समवेअर हल्ल्याचाही उल्लेख आहे.
कंत्राटी हॅकर्सचा वापर करून चीनचे हल्ले
चीनच्या राष्ट्र सुरक्षा मंत्रालयाकडून गुन्हेगारी कंत्राटी हॅकर्सचा वापर केला जात असल्याचा दावा बायडेन प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. हे हॅकर्स स्वतःच्या फायद्यासाठी सायबर खंडणी मोहिमा राबवितात असे त्यांनी सांगितले. सोमवारीच अमेरिकेच्या न्याय विभागाने चार चीनी नागरिकांविरोधात आरोपांची घोषणा केली. हे सर्व जण चीनच्या राष्ट्र सुरक्षा मंत्रालयासाठी काम करत होते आणि कंपन्या, विद्यापीठे, सरकारी संस्थांच्या संगणकांवर हल्ला करणारी हॅकिंग मोहिम ते चालवत होते असा आरोप फिर्यादींनी केला आहे. बायडेन प्रशासन रशियन सिंडीकडेकडून केल्या जाणाऱ्या सायबर आणि रॅन्समवेअर हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असताना चीनच्या सरकारी हॅकर्सकडून राबविल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्याचा धोकाच या घोषणेमुळे अधोरेखित झाला आहे.