वॉशिंग्टन- अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका 'वॉलमार्ट स्टोअर'मध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले आहेत. टेक्सासमधील एल पासो शहरामध्ये ही घटना घडली.
टेक्सास प्रांताचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गोळीबाराची घटना राज्यातील सर्वात भयंकर हल्ला असल्याचे अॅबॉट यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरुन पॅट्रीक क्रुसेस या २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.
एल पासो शहरातील सेलो व्हिस्टा मॉलजवळ असेलेल्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये ही घटना घडली. हे ठिकाण अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेजवळ आहे. याप्रकरणी फक्त एका २० वर्षीय संशयीताला अटक करण्यात आली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला नाही, असे पोलीस अधिकारी रॉबर्ट गोमेज यांनी सांगितले.
व्हिस्टा मॉल आणि वॉलमार्ट दोन्हीही ठिकाणांची तपासणी केली आहे, त्याठिकाणी आणखी हल्लेखोर नसल्याचे गोमेज यांनी सांगितले.
टेक्सासमध्ये गोळीबाराची भंयकर घटना घडली. हा एक भ्याड हल्ला आहे. या हल्ल्याचा आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो. निष्पाप लोकांना मारण्याचे हे कृत्य निषेधार्थ आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. हल्ल्याच पुढील तपास सुरु आहे.