वॉशिंगटन- राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. तर रायगड, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर, कराड , चिपळूण, रत्नागिरी, सागंली या ठिकाणी महापुराने जनजीवन विस्कळीत झाले. या घटनेनंतर हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तर आरोग्य यंत्रणेकडूनही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता या दरडग्रस्त आणि पूरग्रस्त भागात अमेरिकेतील एखा समाजसेवी संस्थेकडून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अमेरिकेतील एक स्वयंसेवी संस्था राज्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागात जिथे 200 पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पूरवणार आहे. यासाठी संस्थेकडून बुधवारी 3 आरोग्य पथके कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या बाधित जिल्ह्याकरीता रवाना झाल्या असल्याची माहिती अमेरिकेअर या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली.
मुंबईतील अमेरिकेअर इंडिया फाऊंडेशन या संस्थेचे कर्मचारी आणि मुंबईतली स्थानिक आरोग्यसेवा देणाऱ्या एका समुहाच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. यामध्ये आवश्यक वैद्यकीय मदत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 दिवस प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले.