हैदराबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या आज अध्यक्षीय पदासाठीच्या चर्चेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. टीव्ही वाहिन्यांवर ही डिबेट लाइव्ह असणार आहे. यात दोन्ही नेते आपल्या उजव्या बाजू मांडण्याचा प्रयत्न करतील. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या कमजोरीवर लोकांचे लक्ष वेधण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणूक येऊन ठेपली आहे.
सध्याच्या कोरोना संकटावर या चर्चेत जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे. करोडो अमेरिकन लोकांच्या या काळात नोकऱ्या गेल्या आहेत, हाही चर्चेचा मुद्दा राहणार आहे.
मॉडरेटर आणि स्वरुप -
ट्रम्प आणि बिडेन यांच्यातील संपूर्ण चर्चा फॉक्स न्यूजचे क्रिस वॅलस हे घडवून आणणार आहेत. क्रिस यांची ओळख स्पष्टवक्तेपणा असणारा व्यक्ती अशी आहे. यापूर्वी क्रिस २०१६च्या अध्यक्षीय चर्चेतही सहभागी होते. ते सरळ प्रश्न विचारून नेत्यांना बोलते करतात. 'मी सत्य शोधणारा व्यक्ती नाही. नेते या व्यासपीठावर काय बोलतात त्यातील तथ्य आणि सत्यता पडताळण्याचे काम माझे नाही', अशा शब्दांत यापूर्वी क्रिस यांनी आपली भूमिका स्षष्ट केली आहे.
सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना -
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि बिडेन हस्तांदोलन (हँडशेक) करणार नाहीत. दोघांच्या उभ्या राहण्याच्या जागेत विशिष्ट अंतर ठेवण्यात येणार आहे. समोर बसलेल्या श्रोत्यांमध्येही आवश्यक सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली आहे.