अलिकडच्या काही वर्षात भारत सरकार भारतीय वंशाच्या लोकांनी परदेशात यश मिळवले तर खूप गाजावाजा करते. मग ते कितीही दूर असू देत. म्हणूनच अमेरिकेतल्या राजकारणात उच्च स्थानावर पोचलेल्या, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर सरकार काहीच प्रतिक्रिया देत नाही, याचे आश्चर्य वाटते.
हॅरिस अभिमानाने त्यांच्या मूळ वंशाबद्दल सांगतात. आईकडून शिकलेल्या गोष्टीही सांगतात. तामिळनाडूत अमेरिकेला स्थलांतरित झालेली तिच्या आईची पहिली पिढी. जगातले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष पद, यापासून थोड्याशाच दूर असलेल्या कमला हॅरिस. कॅरिबियन ते पोर्तुगाल आणि आयर्लंड, सिंगापूर, फिजी आणि मॉरिशस या अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे प्रमुख नेते आहेत. हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होण्याची शक्यता खूप मोठी आहे आणि माध्यमे, अमेरिकेतले भारतीय आणि इतरांमध्येही त्यांचे कौतुक होत आहे.
सरकार गप्प असण्यामागे बरीच कारणे आहेत. एक तर भारत सरकारची ट्रम्प प्रशासनाशी जवळीक आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार हे आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल किती प्रेम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. भारताशी गाढ संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोघेही करत असतात.
भारताने उघडपणे दाखवलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरचे सख्य डेमोक्रॅटिक पक्षाला फारसे आवडले नाही. मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करणे आणि नागरिकत्व कायद्यात केलेली दुरुस्ती यावर डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते टीका करत असतात. आणि हे सर्व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ( डेमोक्रॅटिक पक्ष ) बराक ओबामा आणि मोदी यांची जवळीक असतानाही होत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधल्या परिस्थितीवर उघडपणे टीका करणाऱ्या नेत्यांपैकी हॅरिस या एक आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये जम्मू - काश्मीरसंदर्भातल्या हाऊसच्या परराष्ट्र संबंध समितीबरोबरच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बाहेर पडले यावरही हॅरिस यांनी टीका केली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टन इथे झालेल्या ‘ हाऊडी मोदी या कार्यक्रमापासून त्यांनी स्वत:ला दूरच ठेवले होते. त्यावेळी भारत-अमेरिका भागीदारी साजरी करण्यासाठी ट्रम्प यांच्यासह भारतीय वंशाचे अमेरिकेतले सिनेट सदस्य उपस्थित होते.
ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच सरकार डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून कमला हॅरिस आणि जो बिडेन यांच्याबद्दल मौन बाळगून आहे, असे नवी दिल्लीतले रणनीती तज्ज्ञ खासगीत बोलतात. मोदी सरकार ट्रम्प यांना राग येईल असे काहीही करू इच्छित नाही. विशेष करून आता वॉशिंग्टन व्यापारात भारताला जीएसपीमध्ये ( जनरलाइझ सिस्टम ऑफ प्रेफरन्स ) सामील करून घेणार आहे. याशिवाय सीमेवर भारत आणि चीन संबंध तणावग्रस्त आहेत.
भारताच्या भूभागावर चीनने कब्जा करण्याला पाकिस्तानही पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत नवी दिल्लीला अमेरिकेच्या प्रशासनाचा खुला पाठिंबा कायम ठेवणेही महत्त्वाचे आहे. तसेच रिपब्लिकन्सपेक्षा डेमोक्रॅट्स हे मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर उघडपणे बोलत असतात. नवी दिल्ली प्रशासन कुठलीही टीका खुलेपणाने स्वीकारू शकत नाही. त्यामुळेच हे विषय नवी दिल्लीसाठी सोयीचे नाहीत.
पर्यावरण आणि ग्लोबल वाॅर्मिंग यामध्ये समन्वय असला तरीही डेमोक्रॅटिक्स पर्यावरणाबद्दलच्या काही धोरणांवर प्रश्न विचारू शकतात. जसे की पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन काढून टाकणे. त्यामुळेच कमला हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे भारताचा काही विशेष फायदा होईल, अशी फारशी अपेक्षा नाहीच. खरे तर चिंतेचीच गोष्ट आहे आणि ‘ हाऊडी मोदी ’ या कार्यक्रमात ट्रम्पच विजेते आहेत, अशी त्यांची प्रतिमा सरकारने तयार केली होती. हा कार्यक्रम अमेरिकेतल्या भारतीयांना ‘ बाहेर पडा आणि ट्रम्प यांना मतदान करा ’ हे सांगण्यासाठीच होता.
अहमदाबाद इथे झालेला नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रमही ट्रम्प भारताचे कसे चांगले मित्र आहेत, हे ठसवण्यासाठीच होता. बिदेन यांच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हॅरिस यांच्याबद्दल अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या लोकांना खूप उत्साह आहे. त्यातले अनेक जण कॅलिफोर्नियातल्या भारतीय वंशाच्या सिनेटर्सना स्वीकारतील. अगदी सुरुवातीपासून भारतीय सरकारला जगभरात पसरलेल्या भारतीय वंशाच्या लोकांचा अभिमान आहे. ही संख्या 30 दशलक्षाहून अधिक आहे आणि जगातल्या प्रत्येक भागात आहे. या लोकांचे भारतीय अर्थव्यवस्थेत 80 अब्ज डॉलर्सहून अधिक योगदान आहे. जागतिक प्रमाणात सर्वात मोठे योगदान आहे. देश निर्मितीत या भारतीय वंशाच्या लोकांचे श्रेय भरपूर आहे आणि गेली दोन शतके भारत सरकारने याची दखल घेऊन प्रवासी भारतीय दिवस आणि पुरस्कार ठेवले आहेत.
भारतातली पहिली आणि दुसरी पिढी अमेरिकेत स्थायिक आहे आणि शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात देशाला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे. जवळजवळ 4 दशलक्ष भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत आहेत. ते इतर स्थलांतरित लोकांपेक्षा सर्वोत्कृष्ट शिक्षण घेतलेले आणि सर्वात श्रीमंत आहेत. ही भारत-अमेरिकन भागीदारी फक्त धोरणात्मक आणि आर्थिक नाही, तर सांस्कृतिकदृष्ट्याही ते एकमेकांच्या जवळ आलेले आहेत.
सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला यांसारखे अमेरिकेतले भारतीय हाय टेक कंपन्यांच्या प्रमुख पदी आहेत. त्यापैकी कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमधल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोब आणि आयबीएम कंपन्यांनी त्यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांचे भारताशी असलेल्या नात्याचे स्वागत उघडपणे केले आहे. अमेरिका आणि भारत यांच्या अर्थिक विकासात भारतीय उद्योजिकता महत्त्वाची असल्याचेही हे चिन्ह आहे. नुकताच अभिजीत बॅनर्जींचा नोबल पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कॅलिफोर्निया इथल्या डेमोक्रॅटिक सिनेटर कमला हॅरिस मोठ्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर उमेदवार म्हणून पुढे येतात. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत उच्च राजकीय पद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतात. इतके असूनही भारताकडून एकही कौतुकाचा शब्द नाही. त्यांच्या मूळ वंशाच्या देशात एरवी स्वत:चेच समजून इतर भारतीय वंशाच्या लोकांना अगदी त्वरेने जवळ घेतले जाते.