वॉशिंग्टन डी. सी -तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर बायडेन यांची परदेशी नेत्याशी झालेली ही पहिलीच चर्चा होती.
अफगाणिस्तानमधील घडामोडींबाबत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी बोलताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी काबुलमधील अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काम करत असलेल्या सैनिकांच्या आणि अमेरिकन नागरिकांच्या शौर्याचे कौतुक केले. अफगाणिस्तानसंदर्भातील पुढील रणनिती आणि दृष्ट्रीकोनावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात जी7 नेत्यांची बैठक बोलवण्यात यावी, यावर दोघांचे एकमत झाले.
तालिबानी ताकद वाढली -
अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली आहे. पूर्वीपेक्षा अधिक तालिबानी ताकद वाढली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी तालिबान्यांसमोर शरणागती पत्करात रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला. ते देश सोडून तझाकिस्तानला पळून गेले आहेत. संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अराजकाचे वातावरण पसरले आहे.