वॉशिंग्टन डी.सी -अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. जो बायडेन आणि डेमोक्रॅटीक पक्षाकडून उपाध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शनिवारी रात्री हिंदूना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होत आहेत. जो बायडेन यांनी टि्वट करून हिंदूना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्रोत्सवाला सुरवात झाली असून अमेरिकेसह जगभरात हा उत्सव साजरा करणाऱ्यांना शुभेच्छा. वाईटावर चांगल्याचा विजय अधोरेखित होवो आणि सर्वांना एक नवीन सुरवात करण्याची संधी मिळो, असे टि्वट बायडेन यांनी केले आहे. तसेच याचबरोबर कमला हॅरिस यांनीही अमेरिकन हिंदू आणि त्यांच्या कुटुंबीयांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
2016 च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या 1 टक्के म्हणजे 20 लाखांपेक्षा जास्त हिंदु आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ट्रम्प आणि बायडेन दोघांनीही रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील हिंदुच्या अडचणींवर दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यात मुख्य मुद्दा हिंदुवरील हल्ल्यांचा आणि एच1 बी व्हिसा राहिल.
'हिंदु अमेरिकन फॉर बायडेन' असे अभियान डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि उपाध्यक्ष पदाच्या इंडियन- अमेरिकन उमेदवार कमला हॅरिस यांनी सुरु केले आहे. तर १४ ऑगस्ट रोजी 'हिंदु व्हॉईस फॉर ट्रम्प' हे अभियान डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सुरू केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेतील दोन्ही मोठे पक्ष हिंदु मते मिळविण्यासाठी लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत
अमेरिकी राज्यघटनेनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ केवळ 4 वर्षे आहे. ट्रम्प यांचा हा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात येईल. 2016च्या निवडणुकीत फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांना विजय मिळाला होता. 'रियल क्लिअर पॉलिटिक्स'च्या ओपीनियन पोलनुसार यावर्षी फ्लोरिडामध्ये 3.7 टक्क्यांनी बायडेन आघाडीवर आहेत. 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.