वॉशिंग्टन– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीकरता त्यांची मुलगी व सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी 4 दशलक्ष डॉलरचा निधी जमविला आहे. त्यासाठी इव्हांका यांनी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इव्हांका ट्रम्प यांच्या पहिल्या ऑनलाइन कार्यक्रमात सुमारे 100 लोक उपस्थित राहिले. हा कार्यक्रम झूम या व्हिडिओद्वारे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी देणग्या देणाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. ट्रम्प यांनी ऑनलाइन कार्यक्रमात फोन केला, तेव्हा इव्हांका यांनी स्पीकरफोन सुरू ठेवला होता.
रिपब्लिकन पक्षाचे महिला अध्यक्षा रोन्ना मॅकडॅनियल म्हणाल्या, जमा करण्यात आलेल्या निधीचा उपयोग हा कार्यक्षेत्रावर खर्च करण्यात येणार आहे. देशभरातील समर्थक हे इव्हांका यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना अर्थव्यवस्था, मनुष्यबळ विकास ते कुटुंबांना पगारी सुट्ट्या या विषयावर इव्हांका यांची मते ऐकायचे आहेत.
इव्हांका यांनी वडिलांसाठी 2016च्या निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. त्या सध्या, अध्यक्षांचे सल्लागार म्हणून व्हाईट हाऊसमध्ये विनावेतन काम करतात. ट्रम्प यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जोई बिडेन यांनी नुकतेच ऑनलाइन कार्यक्रमामधून 1.7 दशलक्ष डॉलरची देणगी जमविली होती.