वॉशिंग्टन -दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबु बकर अल-बगदादीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. अनेक मीडियासंस्थांच्या वृत्तानुसार, शनिवारी उत्तरपश्चिम सीरियामध्ये अमेरिकेने चालवलेल्या एका मोहिमेदरम्यान बगदादीचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा -हरियाणा सरकारचा आज शपथविधी, भाजप-जेजेपी स्थापन करणार सरकार
या घटनेनंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते. काहीतरी मोठे घडले असल्याचे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु, बगदादीशी संबंधित आणखी कोणतेही खुलासे करण्यात आलेले नाहीत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एक पत्रकार परिषद घेऊन एक मोठी गोष्ट सांगणार असल्याचे व्हाईट हाऊसने ट्विट केले होते. त्यामुळे ट्रम्प बगदादीच्या मृत्यूसंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वीही बगदादीला ठार केले गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या सैन्याने पश्चिम सीरियामध्ये एका मोहिमेदरम्यान ही कारवाई केली. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी पाकिस्तानच्या एबटाबाद येथे करण्यात आलेल्या कारवाईप्रमाणेच हे ऑपरेशनही होते. छाप्यात बगदादीने आत्मघातकी हल्ला केल्याचेही अहवालात नमूद केले आहे. त्याच्या शरीराच्या डीएनए चाचणीनंतरच याची पुष्टी होईल. सीरियाच्या सूत्रांनीही बगदादीच्या मृत्यूसंदर्भात वृत्त दिले आहे.