वॉशिंग्टन : महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ कॅलिफोर्नियातील भारतीय अमेरिकन समुदायातील नागरिकांनी शांती आंदोलन केले. यावेळी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करीत शांती आंदोलनाला विरोधही दर्शविला. महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा सगळीकडून निषेध केला जात आहे.
भारतीय समुदायाचा समावेश
कॅलिफोर्नियातील एका सिटी पार्कमध्ये हे सामुदायिक शांती आंदोलन करण्यात आले. इंडियन असोसिएशन ऑफ साक्रामेन्टो आणि भारतीय-अमेरिकन हिंदु संघटनांनी या शांती आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी गांधी पुतळा शांती समितीचे सदस्य श्याम गोयल यांनी पुतळा विटंबनेच्या घटनेवर दुःख व्यक्त केले. शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आपल्या समस्या सोडविण्यासाठी महात्मा गांधींचे विचार आजही जगासाठी अपरिहार्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. डेविस शहराच्या महापौर ग्लोरिया पार्टीडा यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले.