वॉशिंग्टन- भारतीय वंशाचे चिकित्सक डॉ. विवेक मूर्ती हे अमेरिकेतील कोरोना विषाणू कृती दलाच्या सह-अध्यक्षपदी निवडले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नवनियुक्त अध्यक्ष जो बायडेन सोमवारी त्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.
मूळचे कर्नाटकातील रहिवासी असलेले ४३ वर्षीय मूर्ती यांची २०१४ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचे १९ वे सर्जन जनरल म्हणून नियुक्ती केली होती. यूकेमध्ये जन्मलेल्या मूर्तींनी अवघ्या ३७ व्या वर्षी या पदाचा भार सांभाळला होता. इतक्या कमी वयात हे पद सांभाळणारे ते पहिले सर्जन होते. ओबामांनंतर ट्रम्प प्रशासनाने त्यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता.
कृती दलाची बैठक काही दिवसांमध्येच सुरू
कोरोना महामारीशी लढण्यासाठी कृती दलाची लवकरच स्थापना करण्यात येईल. त्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही योजना विज्ञानाच्या पायावर तयार केली जाईल. कोरोनाची साथ रोखण्यामध्ये आम्ही कसलीही कसर सोडणार नाही, असे बिडेन यांनी शनिवारी रात्री डिलवेअरच्या विलमिंग्टन येथे आपल्या विजयी भाषणात सांगितले होते. 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार या टास्क फोर्सचे अध्यक्ष माजी सर्जन जनरल डॉ. मूर्ती आणि अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर असतील. कृती दलाची बैठक काही दिवसांमध्येच सुरू होऊ शकते, असेही दैनिकात म्हटले आहे.
बायडेन प्रशासनात ते आरोग्य सचिव असतील?
बायडेन यांच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत, सार्वजनिक आरोग्य आणि कोरोना विषाणू मुद्द्यांवरील सर्वोच्च सल्लागारांपैकी मूर्ती एक होते. अनेकांचा असा विश्वास आहे की, कदाचित बायडेन प्रशासनात ते आरोग्य सचिव असतील. मे महिन्यात बायडेन मोहिमेत कॉंग्रेसच्या महिला नेत्या प्रमिला जयपाल आणि मूर्ती यांना आरोग्य सुरक्षा कृती दलाचे सह-अध्यक्ष म्हणून नेमले होते.