वॉशिंग्टन डी. सी -अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाली आहे. बायेडन यांनी आपल्या 'व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव पदी भारतीय वंशाचे वेदांत पटेल यांची निवड केली आहे. वेदांत पटेल हे बायडेन यांच्या विश्वसनीय लोकांपैकी एक आहेत. बायडेन यांचा शपथविधी सोहळा जानेवारी महिन्यात होणार आहे. वेदांत पटेल हे शपथविधी सोहळ्याचे वरिष्ठ प्रवक्तादेखील आहेत.
वेदांत पटेल यांनी यापूर्वी भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांच्यासोबत काम केले आहे. प्रमिला जयपाल यांचे ते माध्यम संचालक होते. बायडेन यांच्या प्रचार अभियानामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जो बायडेन यांनी व्हाइट हाऊस कम्युनिकेशन्स आणि प्रेस स्टाफसाठी एकूण 16 जणांची निवड केली आहे. त्यामध्ये वेदांत पटेल यांचा समावेश आहे.
एक अनुभवी टीम तयार करण्यासाठी 16 जणांची निवड करण्यात आली आहे. हे सदस्य राष्ट्रध्यक्ष आणि उपराष्ट्रध्यक्षाच्या वतीने सूचना आणि माहितीचे प्रसारण करण्यात आणि महामारी काळात जनतेचा विश्वास संपादन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लॅन यांनी सांगितले.