पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (यूएनजीए) सहभागी होणार आहेत. अजेंडा 2030 ला केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय स्तरावरील विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता आहे. अमेरीका दौऱ्यादरम्यान, 23-24 सप्टेंबरला न्यूयॉर्कमधील कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी अजेंडा 2030 ची अंमलबजावणी करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित करतील. या कार्यक्रमांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान विषयक परिषद, जागतिक आरोग्य विषयक उच्चस्तरीय बैठक, शाश्वत विकास लक्ष्य परिषद, राजकीय संवाद तसेच 24 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा समावेश आहे.
हेही वाचा -खलिस्तानी, बनावट काश्मीरी गट 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या तयारीत
अजेंडा 2030 च्या प्रस्तावामध्ये जागतिक नेत्यांनी असे ठामपणे सांगितले होते की, “शाश्वत विकासाशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही आणि शांततेशिवाय शाश्वत विकास होऊ शकत नाही” यूएनजीए येथे जागतिक नेत्यांशी संवाद साधताना मोदी, हे उद्दीष्ट सुनिश्चित करण्यासाठी बहुपक्षीय सुधारणांवर भारत लक्ष केंद्रित करेल, अशी शाश्वती देऊ शकतात.