वॉशिंग्टन -अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारत दौऱ्याबाबत विचारले असता, अतुलनीय भारताशी आपले विलक्षण संबंध असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी भविष्यात वॉशिंग्टन हे नवी दिल्लीसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करणार आहे अशी माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर होते. अमेरिकेमध्ये परतल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांना या दौऱ्याबाबत माहिती देत होते. यावेळी ते म्हणाले, की द्विपक्षीय संबंधांबाबत दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. भारतासोबतचे आपले संबंध सध्या विलक्षण आहेत. तसेच, भविष्यात भारतासोबत अमेरिका मोठ्या प्रमाणात व्यापार करणार आहे.
भारत आणि अमेरिका हे अद्याप व्यापारासंबंधी सर्वसमावेशक करारापर्यंत पोहचू शकले नाही. मात्र, दोन्ही देशांदरम्यान वाटाघाटी सुरूच आहेत. तसेच, लवकरच दोन्ही देशांदरम्यान एक करार होईल अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली.
बुधवारी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प म्हटले, की भारत दौऱ्यादरम्यान आम्हाला फार चांगली वागणूक मिळाली, आणि आम्ही या दौऱ्याचा आनंद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती, आणि उत्कृष्ट नेते आहेत. तसेच, भारत हा एक अतुलनीय देश आहे. ते (भारत) अब्जावधी डॉलर्स अमेरिकेत पाठवत आहेत, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
हेही वाचा :दिल्लीतील हिंसाचाराची संयुक्त राष्ट्रांनी घेतली दखल, सरचिटणीसांनी केले संयम बाळगण्याचे आवाहन..