जिनिव्हा -जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावरील दहा देशांची मंगळवारी निवड करण्यात आली. यामध्ये भारताचाही समावेश करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.
डब्ल्यूएचओच्या निवड समितीने या कार्यकारी मंडळाची निवड केली. यामध्ये भारतासह बोट्स्वाना, कोलंबिया, घाना, गिनी-बिसाऊ, मादागास्कर, ओमान, रशिया, रिपब्लिक ऑफ कोरिया आणि युनायटेड किंगडमचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या जागतिक आरोग्य सभेच्या ७३व्या परिषदेमध्ये याबाबत घोषणा करण्यात आली. कोरोना विषाणूसंदर्भात डब्ल्यूएचओच्या प्रतिसादाची चौकशी करण्याच्या आवाहनानंतर भारताला या मंडळावर नियुक्त करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटना कोरोना महामारीला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे, याबाबत स्वतंत्र्यरित्या चौकशी करण्याची बहुतांश राष्ट्रांनी मागणी केली होती. कोरोनामुळे जगभरात तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच जागतिक अर्थव्यवस्थाही जमीनदोस्त झाली आहे.