नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे. या परिषदेवर निवड होण्याची ही भारताची आठवी वेळ आहे. १ जानेवारी २०२१पासून पुढील दोन वर्षांसाठी भारत या परिषदेवर असणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, सुरक्षा परिषेदच्या अस्थायी सदस्यांची निवड प्रक्रिया...
कशा प्रकारे होते ही निवडणूक..?
१७ डिसेंबर १९६३च्या सुधारणेनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधील अस्थायी सदस्यांची संख्या ६ वरून १० करण्यात आली. चार्टरच्या अनुच्छेद २३मध्ये ही सुधारणा ३१ ऑगस्ट १९६५पासून लागू करण्यात आली.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाच स्थायी सदस्य आहेत. चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम (यामध्ये ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडचाही समावेश आहे) आणि अमेरिका हे ते पाच सदस्य. तसेच यातील दहा अस्थायी सदस्यांची निवड ही संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधून केली जाते. दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात येते.
निवड प्रक्रियेच्या नियमांमधील १४२व्या नियमानुसार, दरवर्षी पाच अस्थायी सदस्यांची निवड करण्यात येते. १९६३मध्ये झालेल्या अठराव्या सत्रामध्ये या निवडीसाठी एक पॅटर्न लागू करण्यात आला. त्यानुसार अस्थायी सदस्यांपैकी -
- पाच सदस्य आफ्रिकन आणि आशियाई देशांमधील हवेत.
- एक सदस्य पूर्व-युरोपियन देशांमधील हवा.
- लॅटिन अमेरिकन देशांमधून दोन सदस्य हवेत.
- पश्चिम युरोपीय आणि इतर देशांमधून दोन सदस्य हवेत.