वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. ट्रम्प यांचे हे तिसरे 'स्टेट ऑफ युनियन' भाषण होते. या स्टेट ऑफ युनिययनची थीम आहे, 'इट्स द ग्रेट अमेरिकन कमबॅक' (अमेरिकेची महान वापसी). यावेळी ट्र्म्प यांच्या भाषणापेक्षा जास्त चर्चा राहिली, ती ट्रम्प आणि पेलोसी यांच्यामधील शीतयुद्धाची.
संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती नॅन्सी पेलोनी यांनी हस्तांदोलन करण्यासाठी ट्रम्प यांच्यासमोर हात पुढे केला असता, ट्रम्प यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे, ट्रम्प यांचे भाषण संपताच, पेलोनी यांनी संसदेतील सर्वांसमोर या भाषणाच्या प्रती फाडून टाकल्या.
या भाषणातील काही ठळक मुद्दे..
- ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या समस्येबाबत बोलताना सांगितले, की आम्ही मिळून चीनसोबत यावर उपाय शोधत आहोत. आपल्या नागरिकांना या विषाणूपासून वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आपले प्रशासन करत आहे.
- चीनने अनेक दशकांपर्यंत अमेरिकेचा फायदा घेतला. आम्ही हे थांबवले. सध्या चीनचे राष्ट्रपती असलेले शी जिनपिंग आणि त्यांचे सरकार यांच्यासोबत आता अमेरिेकेचे चांगले संबंध आहेत.
- आपले प्रशासन कट्टरपंथीय इस्लामी दहशतवादाशी लढत आहे. मागच्या आठवड्यात मी पॅलेस्टाईन-इस्त्राईल वाद मिटवण्यासाठी शांतता योजनेची घोषणा केली आहे.
- तीन वर्षांपूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेकडे इराक आणि सीरियामधील जवळपास २० हजार चौरस मैल जमीन होती. आज इसिसला १०० टक्के नष्ट करण्यात आले आहे, आणि त्यांचा प्रमुख अबु बकर अल-बगदादीचाही खात्मा करण्यात आला आहे.
- इराण सरकारने अणुबॉम्ब बनवण्याचे आपले प्रयत्न सोडायला हवेत. त्यांनी दहशत आणि विध्वंस पसरवणे बंद करुन, आपल्या लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करायला हवे.
- आज अमेरिका खनिजतेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाला आहे.
ट्रम्प यांच्यावरील महाभियोगावर मतदान..
अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात गुरूवारी (स्थानिक वेळेनुसार - बुधवार) ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावावर मतदान होणार आहे.