वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 लाख 97 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरामध्ये 1 लाख 97 हजार दगावले... जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 लाख 30 हजार 82 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 97 हजार 246 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 7लाख 98 हजार 776 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 616 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
अमेरिकेत आत्तापर्यंत 9 लाख 25 हजार 38 कोरोनाबाधित असून 52 हजार 185 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 2 लाख 19 हजार 764 कोरोनाबाधीत तर 22 हजार 524 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यापाठोपाठ इटलीमध्ये 1 लाख 92 हजार 994 जण कोरोनाबाधित आहेत. तर 25 हजार 969 जणांचा बळी गेला आहे.
जगभरात 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत. सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूच्या विरोधातील लस बनविण्यात यश येईल, असा दावा ऑक्स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणूवरील लस बनविण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. मात्र, त्याआधीच लस शोधून काढण्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. ब्राझील, कुवैत, अफगाणिस्तान, मालदिव, अमेरिका या देशांना भारताने मदत केली आहे.