हमबर्ग- पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या स्वीडनच्या १७ वर्षीय मुलीने सुरू केलेल्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' आंदोलनाला आता चांगले बळ मिळताना दिसत आहे. जर्मनीच्या हमबर्ग शहरात फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जवळपास ६० हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता.
विशेषत: युरोपीय देशांमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनांप्रमाणे आता 'युएसए'मध्येही आंदोलन होत असल्याने आंदोलनाच्या आयोजक अलेक्झांड्रिया व्हिलासोर यांनी समाधान व्यक्त केले. आता अमेरिकन लोकही पर्यावरण वाचवण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी ग्रेटाला आंदोलनाचा फोटो ट्विट करून सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र, युएसएमधील नागरिक पर्यावरणाविषयी सजग असल्याचे या आंदोलनातून दिसत आहे.
युनायटेड स्टेट्सला नियमितपणे या प्रकाराच्या संख्येची आवश्यकता आहे, असे वॉशिंग्टनमधील फ्रायडे फॉर फ्युचरचे आयोजक शिक्षक जेरोम फॉस्टर यांनी भव्य आंदोलनानंतर सांगितले. दरम्यान, दर शुक्रवारी शाळेत न जाता आंदोलन करण्याचा ग्रेटाचा हा ७९ वा आठवडा आहे.
काय आहे फ्रायडे फॉर फ्युचर
पर्यावरण विषयावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रेटा थनबर्गने सोशल मीडियावर 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही मोहीम उभारली आहे. या मोहिमेला जगभरातील विविध देशांमधून मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर यांसह आणखीन काही शहरांमध्ये शाळकरी मुले हे आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या ग्रेटाच्या मोहिमेने अनेकजण आता प्रभावित होऊन आंदोलनात उतरत आहेत.
हवामान बदलाला अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत. आपल्या घराला आग लागली असताना आपण इतके निवांत गप्पा मारत कसे काय बसू शकतो? असा प्रश्न ग्रेटा वारंवार विचारत आहे. पर्यावरणाची सध्याची होत असलेली हानी, आपल्या घराला लागलेल्या आगीहून कमी नसल्याची ती लोकांना जाणीव करून देत आहे. आज ज्या पद्धतीने कार्बनचे उत्सर्जन, विविध प्रकारची घातक प्रदूषणे सुरू आहेत, यामुळे पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. हे असेच चालू राहिले तर जास्त नाही, येत्या १० वर्षांतच म्हणजेच २०३० पर्यंत अशी स्थिती निर्माण होईल की, आपल्याला वाटले तरी पर्यावरण सुधारण्यासाठी आपण काहीच करू शकणार नाही आणि त्यानंतरचे परिणाम हे मानव जीवासह सर्व जीवसृष्टीसाठी घातक असणार आहेत, असे ग्रेटा हवामान शास्त्रज्ञ आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 'आयपीसीसी'च्या अहवालाचा आधार देऊन सांगते.
हेही वाचा -'अब दिल्ली दूर नही AQI २००'; मुंबईत मुलांचे आंदोलन लक्षवेधी
पर्यावरण वाचवण्यासाठी तिने 'फ्रायडे फॉर फ्युचर' नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होणारी मुले आठवड्यातील दर शुक्रवारी शाळेत जात नाहीत. शुक्रवारी शाळेत न जाता सार्वजनिक ठिकाणी मुले हातात पर्यावरण वाचवण्यासाठी आवाहन करणारे फलक घेऊन लोकांचे लक्ष वेधतात. आम्हा मुलांचे भवितव्य धोक्यात आहे, आपण सर्वांनी पर्यावरण वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा संदेश ती मोठ्या माणसांना देतात.
हेही वाचा -शाळा बंदचा 'तिचा' ७१ वा आठवडा; पर्यावरण वाचवण्यासाठी मुलं आजही शाळेबाहेर