हैदराबाद - अमेरिकेमध्ये कोरोनाची लागण झालेल्या सहा लोकांवर 'कार्डिओव्हॅस्क्युलर थेरपी' म्हणजेच हृदयासंबंधी उपचार करण्यास परवानगी देण्यात आली होती. यांपैकी चार लोकांवर उपचार केल्यानंतर ते यशस्वी झाल्याचेही दिसून आले.
या लोकांवर उपचार करण्यासाठी कॅप-१००२ या प्रक्रियेचा वापर केला जातो. ही प्रक्रिया साधारणपणे हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये मानवी हृदयाच्या उतींच्या मदतीने प्रयोगशाळेमध्ये सीडीसी सेल्स (कार्डिओस्फेअर डीराईव्हड् सेल्स) तयार केले जातात, ज्यांचा वापर रुग्णावरील उपचारासाठी केला जातो.
या प्रयोगाचे सध्याचे निकाल जरी सकारात्मक असले, तरीही कोरोनावर उपचार म्हणून या पद्धतीला अद्याप मान्यता देता येणार नाही असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. 'बेसिक रिसर्च इन कार्डिओलॉजी' या वैद्यकीय नियतकालिकामध्ये या उपचार प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली गेली आहे. सेड्रास-सिनाई रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या.
'अमेरिकन फूड अँड ड्रग एजन्सी'ने (एफडीए) कोरोना रुग्णांवर अशा प्रकारच्या उपचार करण्यास मनाई केली आहे. मात्र, एखाद्या रुग्णावर अगदीच कोणतेच उपचार काम करत नसतील, तर शेवटचा पर्याय म्हणून अशा प्रकारच्या उपचारांना परवानगी दिली जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :झोमॅटो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट; कंपनीने 'हा' घेतला निर्णय