सॅन फ्रान्सिस्को -जगप्रसिद्ध कंपनी 'फेसबुक'ने नुकताच आपला नवा लोगो लाँच केला. फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये वेगळेपण रहावे, यासाठी हा नवीन लोगो लाँच करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
'फेसबुक' कंपनी सध्या फेसबुक, इंस्टाग्राम असे सोशल मीडिया अॅप्स तर व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर हे मेसेजिंग अॅप्स चालवते. यासोबतच ऑक्युलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा ('लिब्रा' ही डिजिटल करन्सी) अशा अनेक सुविधा फेसबुक कंपनी पुरवते.
यासाठी आतापर्यंत 'फेसबुक अॅप'चाच लोगो फेसबुक कंपनीसाठी वापरला जात होता. आतापासून मात्र, फेसबुक कंपनी आपला नवा लोगो वापरेल, तर जुना लोगो हा फेसबुक अॅपसाठी कायम राहील. या लोगोसाठी विशिष्ट प्रकारचा फॉन्ट वापरण्यात आला आहे, तर हा फेसबुक अॅपच्या लोगोप्रमाणे 'स्मॉल' नव्हे, तर 'कॅपिटल' लेटर्समध्ये दिसून येतो.
या नव्या अॅपमुळे फेसबुक कंपनी आणि फेसबुक अॅप यामध्ये फरक दिसून येईल. तसेच, यासाठी फेसबुकच्या नवीन लोगोसह, कंपनीची नवीन वेबसाईटही थोड्याच दिवसांमध्ये सुरु होणार असल्याचे, फेसबुकचे मुख्य विपणन अधिकारी अँटोनिओ लुसिओ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :अजब-गजब! 'या' देशात भूतासारखी वेशभुषा करून साजरा केला जातो उत्सव