न्यूयॉर्क : हेट स्पीच आणि खोट्या माहितीबाबत कंपनीची काही धोरणे आहेत. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्ट त्या धोरणांच्या विरोधात जाताना दिसल्या, तर त्या आम्ही काढून टाकू. असे फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्ग यांनी म्हटले आहे.
३ नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर खोट्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी फेसबुकने गांभीर्याने पावले उचलली आहेत. वादग्रस्त पोस्टना तातडीने हटवण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. तसेच, फेसबुक विश्वासपूर्ण माहिती देणाऱ्या संकेतस्थळांच्या लिंक्सही पुरवणार आहे. आपण याबाबत किती गंभीर आहोत, हे सांगताना सँडबर्ग म्हणाल्या की खोटी माहिती देणारी एखादी पोस्ट अगदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही केली तरी फेसबुक ती डिलीट करण्यास कचरणार नाही.