वॉशिंग्टन - 72 जणांचा बळी घेणाऱ्या काबूल विमानतळावरील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या 'आयएस-के'चा जन्म पूर्व अफगाणिस्तानात सहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर अल्पावधीतच अतिशय झपाट्याने ही संघटना फोफावत गेली आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून उदयास आली.
अमेरिकेच्या नेतृत्वातील सहकारी सैन्याकडून होणाऱ्या कारवाईनंतरही इस्लामिक स्टेट-खुरासानचे अस्तित्व अफगाणिस्तानात कायम राहिले आहे. आणि आता याच संघटनेने काबूल हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेट-खुरासानचा इतिहास जाणून घेऊया, थोडक्यात...
असे पडले खुरासान हे नाव -
इस्लामिक स्टेट या मूळ दहशतवादी संघटनेचे मुख्य फायटर्स सीरिया आणि इराकला गेल्यानंतर मध्य आशियातील संघटनेच्या या शाखेचा 2014 मध्ये अफगाणिस्तानात उदय झाला. इस्लामिक स्टेट-खुरासान असे या शाखेला संबोधले जाते. मध्ययुगीन कालखंडात अफगाणिस्तानसह इराण आणि मध्य आशियातील भूभागाला खुरासान असे संबोधले जात असे. त्यावरून खुरासान हे नाव इस्लामिक स्टेटने या शाखेसाठी जोडले. ही संघटना आयएसके किंवा आयएसआयएसके या नावानेही ओळखली जाते. दरम्यान, सीरिया आणि इराकमधून इस्लामिक स्टेटला संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय फौजांना पाच वर्षे लागली.
आयएस-के मध्ये अनेक बंडखोरांचा सहभाग -
अफगाणिस्तानच्या सीमेलगत आश्रयास असलेल्या पाकिस्तान तालिबानच्या काही बंडखोरांनी एकत्र येत इस्लामिक स्टेट-खुरासानची सुरूवात केली. यानंतर त्यांना इतरही दहशतवादी येऊन सामील झाले. यात अफगाण तालिबानमधील काही नाराज दहशतवाद्यांचाही समावेश होता. अफगाण तालिबानने अमेरिकेसोबत शांती चर्चा सुरू केल्यानंतर नाराज झालेल्या दहशतवाद्यांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. उझबेकिस्तानातील इस्लामिक चळवळीतील काही तरुण, तसेच इराणमधील सुन्नी मुस्लिम समुदायातील फायटर्स, तुर्किस्तान इस्लामिक पार्टीतील काही लोक आणि चीनच्या उईगुरमधील काही जण यात सहभागी झाले.
इस्लामिक स्टेटची गैरमुस्लिमांविरोधात एकजुटीची हाक -