वाशिंग्टन - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून 4 हजार पेक्षा अधिक लोकांनी यामध्ये प्राण गमावले आहेत. तसेच अनेक जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या अमेरिकेतील एका महिलेने आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाली आहे.
एलिझाबेथ स्नायडर असे त्या महिलेचे नाव असून त्या वाशिंग्टनच्या सिएटलमधील रहिवासी आहेत. कोरोनाची लक्षणे आढळल्यास डॉक्टराकडे जावे आणि न घाबरता उपचार करून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे कसे कळाले, त्यावर कसा उपचार घेतला, कोणत्या चाचण्या केल्या, यासंबधीत माहिती एलिझाबेथ स्नायडर यांनी पोस्टमधून दिली आहे. योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच बरा होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोरोना विषाणू हा साथीचा रोग असल्याचे जाहीर केले आहे.