सॅन सॅल्वाडोर :बिटकॉईन चलनाला अधिकृत मान्यता देणारे एल सॅल्वाडोर हे जगातील पहिलेच राष्ट्र ठरले आहे. देशाचे अध्यक्ष नायिब बुकेले यांनी आज याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सॅल्वाडोरन काँग्रेसने बहुमताने याबाबतच्या विधेयकाला मंजूरी दिली.
"सॅल्वाडोरच्या संसदेमध्ये ८४ पैकी ६२ मतांनी बिटकॉईन विधेयक मंजूर झाले. हा एक ऐतिहासिक क्षण आहे!" अशा आशयाचे ट्विट राष्ट्राध्यक्षांनी केले. बुकेले यांनी ५ जूनला या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले होते. मायामीमध्ये झालेल्या बिटकॉईन २०२१ कॉन्फरन्समध्ये जॅक मॅलर्स यांच्या एका प्रेझेंटेशनवेळी राष्ट्राध्यक्षांचा एक प्री-रेकॉर्डेड मेसेज सर्वांना दाखवण्यात आला होता. बिटकॉईनला अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील. यासोबतच, मुख्य अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात नसलेल्या बऱ्याच जणांना यात येण्याची संधी मिळेल, असे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते.
स्ट्राईक या डिजिटल वॉलेट कंपनीचे संस्थापक मॅलर्स म्हणाले, की "एल सॅल्वाडोरच्या ७० टक्के सक्रिय लोकसंख्येकडे बँक खाते नाही. ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहधारेत नाहीत. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी मला बिटकॉईन संबंधी विधेयक लिहिण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याची मागणी केली होती." बिटकॉईन हे जगातील सर्वात आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चलन असल्यामुळे ते लोकांच्या उपयोगी पडेल, असेही मॅलर्स यावेळी म्हणाले.
'बाय यू कॉईन' या आणखी एका डिजिटल वॉलेट कंपनीचे सीईओ शिवम ठकराल यांनी एल सॅल्वाडोरच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला. भारतात क्रिप्टो करन्सीबाबतचा दृष्टीकोन अगदीच वेगळा आहे. सध्या याकडे एक चलन म्हणून नाही, तर गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. देशातील कित्येक गुंतवणूकदारांनी याच्या किंमीत कमी-जास्त होत असूनही यावर विश्वास दर्शवला आहे, असे ठकराल म्हणाले.
हेही वाचा :चीनच्या इशाऱ्यानंतर बिटकॉईनच्या मूल्यात मोठी घसरण