वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच करणार आहेत. याबद्दल त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार आहेत. या प्लॅटफॉर्मचे नाव 'ट्रुथ सोशल' असे असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसारखेच असणार असून त्यावर युजर्स त्यांचे विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतील.
'ट्रुथ सोशल' हे 2022 च्या सुरुवातीस लाँच केले जाईल. हे ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपद्वारे बनवले जात आहे. ट्रम्प यांना या ग्रुपचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. 'ट्रुथ सोशल' हे प्लॅटफॉर्म सध्याच्या उदारमतवादी मीडिया समूहाला टक्कर देईल. ते सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांचा सामना करणार, असे गृपने म्हटलं आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील कंपन्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या एकतर्फी शक्तींचा वापर करत आहेत. या कंपन्यांच्या जुलूमाविरोधात उभे राहण्यासाठी ट्रुथ सोशल आणि टीएमटीजीची स्थापना केली असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
अॅप्पल स्टोरवर याचे बेटा व्हर्जन उपलब्ध नाही. ते नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात येईल. वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये अमेरिकेत 'ट्रुथ सोशल' सुरू होईल. यात व्हिडिओचीदेखील सुविधा असणार आहे. तसेच मनोरंजन, न्यूज पॉडकास्टही प्रसारित केले जाईल. ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे एकूण मूल्य 1.7 अब्ज डॉलर असल्याची माहिती आहे.