वॉशिंग्टन डी. सी - संपूर्ण जगाचे अमेरिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मतमोजणी संपली. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले आहे. मात्र, ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नसून आपणच निवडणूक जिंकल्याचा दावा त्यांनी ट्विटरवरून केला आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
७ कोटी १० लाख मते मिळाली
'मतमोजणीच्या ठिकाणी निरीक्षण पथकास पाहणी करण्यास मज्जाव करण्यात आला. मी ही निवडणूक जिंकली असून मला ७ कोटी दहा लाख वैध मते मिळाली आहेत. लाखो लोकांना खोट्या मतपत्रिका पाठविण्यात आल्या, असा दावा ट्रम्प यांनी केला असून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पुरावा नसताना अनेक वादग्रस्त ट्विट
मतमोजणी सुरू असताना काही महत्त्वाच्या राज्यांत जो बायडेन आघाडीवर गेले असता ट्रम्प यांनी पोस्टाने आणि मेलने येणारी मते ग्राह्य न धरण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली. त्यांनी अनेक राज्यातील मतमोजणीस न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मतमोजणी सुरू असताना ट्रम्प यांनी कोणताही पुरावा नसताना अनेक ट्विट केले होते. जे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे होते. त्यामुळे ट्विटरनेही ही ट्विटस् दाखवली नाहीत.
प्रत्येक मत मोजा vs मतमोजणी थांबवा
कोरोनामुळे अनेक नागरिकांनी पोस्टाने आणि मेलने मतदान केले होते. ही सर्व मते मोजण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी केली. त्यांचे समर्थकही रस्त्यांवर उतरले होते. तर उशीरा येणारी मते मोजली जाऊ नये अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती. ही मते ग्राह्य नाहीत, अनेक राज्यात मतमोजणी करताना घोटाळे होत आहेत, चुकीच्या पद्धतीने मतमोजणी सुरू आहे, असे आरोप ट्रम्प यांनी केले आहेत. ही सर्व प्रकरणे आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजय झाल्यानंतर बायडेन यांना कायदेशीर लढाई जिंकावी लागणार आहे.