वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी तालिबानसोबतच्या शांतता चर्चेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. तालिबानने काबूलमध्ये कार बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात १२ जण ठार झाले होते. यात एका अमेरिकन जवानाचाही समावेश होता. तालिबानने नंतर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर ट्रम्प यांनी अनेक ट्विटस करत माघार घेण्याची घोषणा केली.
ट्रम्प यांनी ट्विट करत तालिबानच्या प्रतिनिधींशी गुप्त बैठक आणि अफगाणी राष्ट्रपती अशरफ घणी यांच्याशी कॅम्प डेव्हिड येथे होणारी बैठक रद्द केल्याचे म्हटले आहे. 'तालिबानच्या महत्त्वाच्या नेत्यांशी आणि अफगाणी राष्ट्रपती अशरफ घणी यांच्याशी कॅम्प डेव्हिड येथे गुप्त बैठक होणार होती. ते सर्व आज रात्री अमेरिकेला येणार होते. दुर्दैवाने, खोटी पत मिळवण्याच्या उद्देशातून त्यांनी काबूलवर हल्ला केला. यात आमचा एक महत्त्वाचा जवान आणि इतर ११ नागरिक ठार झाले. त्यामुळे मी ताबडतोब शांततेसाठीच्या वाटाघाटी थांबवल्या,' असे ट्रम्प यांनी दोन ट्विट करत म्हटले आहे.
हेही वाचा - काश्मीरमध्ये निर्बंध आणि राजकीय वावर कमी करण्याचा अमेरिकेचा आग्रह
'हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? वाटाघाटी स्वतःच्या बाजूने झुकविण्यासाठी स्वतःचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ते या कारावाया करत आहेत. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे त्यांची बाजू जास्त कमकुवत बनली आहे. जर ते अत्यंत महत्त्वाच्या अशा शांती चर्चेदरम्यान शस्त्रांचा वापर थांबवण्यास तयार नसतील आणि १२ निष्पाप लोकांचे बळी घेत असतील तर, ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाहीत. तसेच, या चर्चेतून कोणताही अर्थपूर्ण करार होऊ शकत नाही. आणखी किती वर्षे त्यांनी युद्ध करण्याची इच्छा आहे,' असे म्हणत ट्रम्प यांनी तालिबानवर कडाडून हल्ला चढवला आहे.
मागील काही महिन्यांपासून अमेरिका दोहा येथे तालिबानसोबत वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्यक्षात तालिबान अफगाण सरकारशी थेट चर्चा करण्यास नाखूश आहे. अफगाण सरकार हे अमेरिकेचे कळसूत्री बाहुले असल्याचे तालिबानचे मत आहे.
हेही वाचा - सीरियात इसिसशी (ISIS) संबंधित अद्यापही ३ हजार दहशतवादी अस्तित्वात - रशिया
याआधी अमेरिकेचे राजदूत झालमे खलिलझाद यांनी अफगाण सरकारला तालिबानसोबत १८ वर्षे सुरू असलेले दीर्घ तत्वतः युद्ध संपवण्याच्या कराराविषयी माहिती दिल्यानंतर काही तासांतच एक कार बॉम्बस्फोट झाला होता. यात ५ जण ठार झाले होते. या स्फोटामध्ये विदेशी सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आल्याचे तालिबानने म्हटले आहे.