मिनिआपोलिस - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या हत्या प्रकरणात अमेरिकेच्या एका कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या मिनिआपोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना 22 वर्ष आणि 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी वॉशिंग्टनच्या हेन्नेपिन काउंटी कोर्टाने मिनियापोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवले होते. अखेर एका वर्षानंतर जॉर्ज फ्लॉइड यांना न्याय मिळाला असून 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' चळवळीला यश आले आहे.
फिर्यादींनी 30 वर्षांची शिक्षा डेरेक शॉविनयांना ठोठवण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, डेरेक शॉविन यांच्यावर पूर्व गुन्हेगारीची नोंद नाही. त्यामुळे न्यायाधीशांना 10 वर्ष ते 15 वर्षे दरम्यान शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. न्यायाधीश पीटर ए. कॅहिल यांनी शॉविनला 22 वर्षे 6 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
दोषी आढळलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आई कॅरोलिन पावलेन्टी न्यायालयात उपस्थित होत्या. आपल्या मुलावर दया दाखवावी, अशी विनंती त्यांनी न्यायधीशांना केली. तुम्ही सत्यापासून दूर आहात. माझ्या मुलावरील सर्व आरोप खोटे आहेत. माझा मुलगा एक चांगला माणूस आहे, असे त्यांनी न्यायालयात म्हटलं. तसेच डेरेकला उद्देशून त्या म्हणाल्या, की मी नेहमीच तुझ्या निरागसतेवर विश्वास ठेवला आहे. तुझ्या परतण्याची मी वाट पाहील. यावेळी त्या भावनिक झाल्या होत्या.
कसा झाला होता जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू?
कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडला अटक करत असताना, पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज पोलिसाला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरात वातावरण तापले होते.
कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून बळी गेल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये आगडोंब उसळला आहे. अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली आहेत. विविध ठिकाणी 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' नावाने निदर्शने करण्यात आली. शांततेत केलेल्या या निदर्शनांमधून हजारो नागरिकांनी जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली वाहिली होती. #BlackLivesMatter आणि #JusticeforGeorgeFloyd हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते.