हवाना - क्युबाचे पर्यटन मंत्री मॅनुएल मर्रेरो क्रूझ यांची देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९७६ नंतर पहिल्यांदाच क्युबाला पंतप्रधान मिळाला आहे. देशाचे अध्यक्ष मिग्युएल डियाझ-कॅनेल यांनी ही घोषणा केली.
१९७६ साली क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो यांनी देशाचे पंतप्रधानपद बरखास्त केले होते. त्यानंतर, यावर्षी देशाची घटनादुरुस्ती करून काही नवीन नियम लागू करण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधानपदही पुन्हा लागू करण्यात आले होते. पंतप्रधानपदासाठी संसदेमध्ये मर्रेरो यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर, त्याला एकमताने सर्वांनी मंजूरी दिली.
क्युबा देशामध्ये पर्यटन हा मोठा व्यवसाय आहे. परकीय चलन मिळवण्याचा मुख्य स्रोत हा पर्यटन व्यवसायच आहे. गेली १६ वर्षे देशाचे पर्यटन मंत्री असलेले मर्रेरो यांचा इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात हातखंडा असल्यामुळे, ते या पदासाठी योग्य असल्याचे कॅनेल यांनी म्हटले. २००४ला फिडेल कॅस्ट्रो यांनीच मर्रेरो यांची पर्यटन मंत्री म्हणून निवड केली होती. पंतप्रधान झाल्यानंतर ते पर्यटन मंत्री म्हणूनही काम पाहतील का याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
दरम्यान, अभ्यासकांच्या मते हे केवळ वरवरचे बदल आहेत. पंतप्रधानपदी कोणी असले, तरी या बेटावर मात्र खरी सत्ता ही क्युबन कम्युनिस्ट पक्ष आणि लष्कराच्याच हातात राहील.
हेही वाचा : पुतीन यांचा ट्रम्पना पाठिंबा; म्हणाले महाभियोग हा अध्यक्षांविरोधात कट