महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

स्वत:च्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांमध्ये फरक केला जाऊ नये- भारताचा सुरक्षा परिषदेत चीनला टोला - संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद

संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद हे एका महिन्यासाठी भारताकडे आहे. हे पद भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे भूषवित आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील युएनएससीच्या बैठकीत 'दहशतवादी कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर होणारा धोका' या विषयावर चर्चा करण्यात आली.

परराष्ट्र व्यवहार मंत्री
परराष्ट्र व्यवहार मंत्री

By

Published : Aug 19, 2021, 9:49 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ- भारताने संयुक्त राष्ट्रंसघाच्या परिषदेत चीनला टोला लगावला आहे. दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय कोणत्याही कारणाशिवाय देशांकडून रोखला जाणे किंवा अडथळा आणणे टाळायला पाहिजे. असे होत नसेल तर ही दुटप्पी वागणूक आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांमध्ये फरक केला जाऊ नये, असेही भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद हे एका महिन्यासाठी भारताकडे आहे. हे पद भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे भूषवित आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील युएनएससीच्या बैठकीत 'दहशतवादी कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर होणारा धोका' या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना जयशंकर म्हणाले, की सर्व प्रकारच्या दहशतवादाची आंततराष्ट्रीय समुदायावर एकत्रित जबाबदारी आहे. दहशतवादाच्या खतपाणी घालण्याचा निषेध केला पाहिजे. त्यामागे कोणतेही कारण असले तरी दहशतवादाबाबत कोणताही अपवाद किंवा स्पष्टीकरण असू शकत नाही, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत म्हटले.

हेही वाचा-अफगाण संकट : डेहराडूनमधील 83 अफगाण कॅडेटसचे भवितव्य अधांतरी

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करू नका-

भारताच्यावतीने बोलताना जयशंकर यांनी चालू वर्षातील जानेवारीत पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील गोष्टींचा पुनरुच्चार केला. त्यावेळी जयशंकर यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आठ कलमी कृती कार्यक्रमाचा प्रस्ताव मांडला होता. दहशतवादाचे समर्थन करू नका. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करू नका. दुटप्पी नको. दहशतवादी हे दहशतवादी आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यामध्ये भेदभाव करण्यात येतो. त्यांची यादी करताना रोखू नका किंवा अडथळे आणू नका.

हेही वाचा-ट्विटरकडून अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचे ट्विटर अकाउंट बंद


संयुक्त राष्ट्रसंघाला मोठ्या प्रमाणात निधी पुरविला पाहिजे

आंतरराष्ट्रीय समुदायाने संघटित गुन्हेगारींची लिंक पाहायला हवी. एफएटीएफला सहकार्य आणि बळकटीकरण करावे. दहशतवादाचा बिमोड करण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाला मोठ्या प्रमाणात निधी पुरविला पाहिजे. सुरक्षा परिषदेने एकत्रितपणे तत्वांची बांधणी करावी, असे मी आवाहन करत आहे. हे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी खूप काळापासून भारत हा चॅम्पियन राहिला आहे.

हेही वाचा-मुनव्वर रानांकडून तालिबानचे समर्थन, म्हणाले भारतात रामराज नाही, कामराज!

काय केले होते चीनने...

सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्य असलेल्या चीनने तांत्रिक कारण दाखवित पाकिस्तानचा दहशतवादी मोहम्मद मसूद अझहरचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यास मार्च 2019 मध्ये नकार दिला होता. जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत फेटाळण्यात आला. त्यानंतर अमेरिकेने चीनला तीव्र शब्दात खडवसावले होते. जर चीन दहशवादाच्या मुद्यावर गंभीर असेल, तर त्यांनी दहशतवाद्यांचा बचाव करू नये, असे अमेरिकेकडून म्हणण्यात आले होते. ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्सने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, चीनने आपल्याकडील 'व्हिटो'चा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. हा प्रस्ताव 27 फेब्रुवारी 2019 ला चौथ्यांदा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी प्रत्येक वेळी चीनने व्हिटोचा अधिकार वापरून मसूद अझहर आणि पाकिस्तानला वाचवले होते. यामुळे चीनच्या भूमिकेवर जगभरातून टीका करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details