वॉशिंग्टन डी. सी - सध्या भारत-चीन सीमेवर तणावग्रस्त वातावरण आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमेवर चीनने 60 हजार सैन्य तैनात केल्याचा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. तसेच, त्यांनी वाईट वागणुकीवरून चीनवर टीका केली. याचबरोबर चीन क्वाड देशांसाठी (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान) धोका असल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून पहिल्यांदा क्वाड देशांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेनंतर देण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियोमध्ये क्वाड बैठक पार पडली. या बैठकीत माइक पॉम्पिओ यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी सखोल चर्चा केली. इंडो पॅसिफिक महासागर परिसरात शांतता, सुरक्षितता आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. एस. जयशंकर यांच्यासोबत झालेली चर्चा सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.