ओटावा -जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. कोरोनावर भारतात लस विकसित करण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लसीचा पुरवठा केला जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी कॅनडासाठी कोरोना लसीची मागणी केली आहे.
कॅनडाला इतर देशांप्रमाणेच लस पुरवठा लवकर केला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी जस्टिन ट्रुडोंना दिली. भारताची प्रचंड औषध निर्माण क्षमता आणि मोदींच्या नेतृत्वाखाली या क्षमतेचा जगाला लाभ मिळत आहे. जगाने जर कोरोनावर विजय मिळवला. तर यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे,असे जस्टिन ट्रुडो म्हणाले.
भारताने डोमिनिकन देशाला कोरोना लस पुरवली आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतर पंतप्रधान रुजवेल्ट स्केरिट यांनी भारताचे आभार मानले. तसेच लसीचा स्टॉक घेण्यासाठी पंतप्रधान स्वत: विमानतळावर पोहोचले होते. पहिल्या खेपेत ३५ हजार मात्रा मिळाल्यानंतर आपल्याला इतक्या लवकर लस मिळेल असं वाटलं नव्हत, असे ते म्हणाले. बार्बाडोसलाही लशीच्या मात्रा नुकत्याच पुरवण्यात आल्या.